Thursday, October 31, 2019

तरीही ती आनंदीच

तरीही ती आनंदीच🌹🌹🌸🌸🌸🌺

,,,,,मारोती आरेवार
 
         काल सावलीच्या बाजारात माझी वर्गमैत्रीण भेटली.माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं.पण मला तिने पाहिले आणि आवाज दिला. मागे वळून पाहतो ,तर मी जरासा विचारताच पडलो,कोण असेल ही नंतर डोक्यात प्रकाश पडला. मी मनाशीच म्हणालो " अरे ही तर आनंदी' तीची सुस्वभावी छबी मला अजूनही आठवते.अभ्यासातही ती खूप हुशार होती.पण परिस्थितीमुळे तिला पुढे शिकायला मिळाले नाही.लग्न होऊन सासरी गेली.मीही खूप दिवसांनी तिला बघितलं नव्हतं.अरे मारोती मी आनंदी ओळखलं नाहीस.मी ओळखली तुला इथून जवळचं माझं सासर.
     कामासाठी दहा बारा वर्ष चंद्रपूरला होतो.पतीदेवांचा अपघात झाल्यामुळे त्यांना जड काम जमत नाही म्हणून परत गावाकडे येऊन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतो. पतीदेवासाठी दवाखाण्याचा खूप खर्च आला. केली कमाई तिथेच घालवली.आता चार पाच महिने यातून सावरून पुन्हा नव्याने जगतो आहोत.
          हे सर्व सांगताना तिचे पतीदेव शेजारीच बसले होते.माझी तिने त्यांच्याशी ओळख करून दिली.मीही तिला माझ्याबद्दल सांगितलं.
         एवढं सारं घडूनही जगण्याची उमेद मात्र ती तसूभरही ढळू दिली नाही.संकटे प्रत्येकाच्या जीवनात असतात त्यांना पेलायचं कसं तिच्याकडूनच शिकावं.
        एवढं सारं दुःख तिच्या वाट्याला असतानाही मला तितक्याच आपुलकीने आवाज देणं'विचारपूस करणं
सारं दुःख लपवून चेहऱ्यावरील आनंद तसूभरही कमी न होणं.खूप काही शिकवून गेलं.
        अजूनही मनात तिचेच शब्द बसले आहेत

मनात विचार येतो
'तरीही ती आनंदीच'
खरच ती आनंदीच रहावी......

Tuesday, May 21, 2019

व्यसनमुक्ती कविता



गेला एक जीव फुका

नाही करू शकला सोनं
कित्येकवेळा आला मोका
व्यसनाला कवटाळून आता
काल गेला एक जीव फुका

अनमोल देहाला ना जाणलं
संस्कारही पायदळी तुडवलं
दारूपाई व्याधीनं ग्रासलं
सांग वेड्या तूनं काय मिळवलं

लेकरांची आबाळ तुला
बाप होऊन नाही समजली
राबणाऱ्या त्या माऊलीची
व्यथा कधी नाही उमजली

का असावी प्रिय नशा तुज
जखडून उगा का धरतो
दिसतो मृत्यू सामोरी तरी
आप्त व्यसनाला करतो

जीवन आहे असे हे सुंदर
आता तरी सावध होई
परतून पुन्हा येणे नाही
व्यर्थच जीवन व्यसनापाई

©मारोती आरेवार गडचिरोली

Friday, April 12, 2019

आता नका विचारू दुखणे जुनेच आहे
जखमा अजून ताज्या रडणे जुनेच आहे

फसव्या प्रलोभणाला पडलो बळी कितीदा
इमान दावणीला झुकने जुनेच आहे

स्पर्धेत धावतांना अटकाव होत आहे
येथे निभाव नाही पडणे जुनेच आहे

जपता अनेक नाती,दमछाक होत आहे
अतृप्त राहले ते,रुसने जुनेच आहे

पाहून तारकांना मज एकटेच वाटे
अलगद नभी ध्रुवाचे तुटणे जुनेच आहे

*मारोती आरेवार गडचिरोली*

Tuesday, March 5, 2019

सल मराठी कविता

सल

कसं होणार आता
मन आतमध्ये रडू लागले
ही सल मनाला कायमची
देशात नाही ते घडू लागले

हक्कासाठी एवढं भांडून
प्रश्न नाहीच मिटू लागले
न भांडताही काहींचे आता
प्रश्न मात्र सुटू लागले

भुकेचे शब्द अंतरातच आणि
इथल्या व्यवस्थेत फडफडू लागले
दोन वेळच्या अन्नासाठी मात्र
मन गुन्ह्याकडे वळू लागले

भ्रष्टाचाराचे वादळ देशात
निर्भयतेने घुमू लागले
साथ देणारी पिलावळं आता
कशी एकत्र जमू लागले

फायद्यासाठी आपल्या ते
हातात हात मिळवू लागले
काल परवा भांडणारे आता
बंध आपले जुळवू लागले

कुणालाच काही नाही वाटत
सारे डोळ्यादेखत घडू लागले
बोलक्या वेदना सारे तरी
आता मुकेपणेच गिळू लागले

""""मारोती आरेवार गडचिरोली

Thursday, January 24, 2019

निष्पाप कैदी

निष्पाप कैदी

आसवांना मोकळे करावे कसे
हुंदक्यांना आत डांबावे कसे

कोंडमारा जीवाचा नित्य चालला
शृंखला ही आता तोडावे कसे

घेईल का समजून माझ्या मना
दुखणे मनाचे हे मांडावे कसे

निष्पाप देह माझा,ही कसली सजा
जोखडातून या मुक्त व्हावे कसे

जगण्यास अर्थ यावा हेच मागणे
एकांतात या कुणा सांगावे कसे

मारोती आरेवार
गडचिरोली